
समान नागरी कायदा

भारतरत्न महिला

हॅप्पी ऑनलाईन शॉपिंग

भारतीय संविधान

मतदात्याचे हक्क आणि कर्तव्ये

शैक्षणिक करिअरच्या दृष्टीने 12 वी हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो. या वळणावर आपण ठरवायचे असते की आपले ध्येय, उद्दीष्टे व भविष्यकालीन जबाबदारी ही कशी असेल. तसे पाहिले तर 12 वी नंतर प्रचंड प्रमाणात विविध स्वरुपाचे अभ्यासक्रम हे उपलब्ध आहे. आपली आवड, आपला कल व त्या अभ्यासक्रमामध्ये असणारी भविष्यकालीन संधी या बाबीचा विचार करुन आपण एक उत्कृष्ट अभ्यासक्रम निवडायचा असतो.
या निवडीच्या क्षणी पालक, विद्यार्थी व शिक्षक हे तिन अतिशय महत्वाची भूमिका बजावतात आपल्या पाल्याला सर्वोत्तम कोर्समध्ये प्रवेश मिळावा ही प्रत्येक पालकांची इच्छा असते. आज तर प्रत्येक पालकांना वाटते की आपले पाल्ये हे मेडिकल, इंजिनिअरिंग यापैकी एका तरी कोर्सला जावे. परंतु हा विचार करत असताना पालकांनी आपल्या मुलाची मनस्थिती द्विधा होणार नाही याची पुरेपुर काळजी घ्यावी. कुठलाही निर्णय घेण्यापुर्वी पालकांनी आपल्या मुलाची कुवत त्याला एखाद्या विषयामध्ये असलेली गती, त्याला एखाद्या विशिष्ट अभ्याक्रमाची असलेली गोडी या सर्वांचा विचार करावा.
विद्यार्थीमध्ये काही गुण हे अपजत असतात. हे गुण पालकांनी व शिक्षकांनी ओळखले पाहिजे व करिअरचा निर्णय घेतांना या गुणांना विशेष प्राधान्य दिले पाहिजे.
12वी नंतर करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहे, त्यातल्या त्यात 1991 नंतर झालेल्या जागतिकीकरणाने त्यामध्ये वैशिक रित्या मोठी भर घातलेली आहे. या शैक्षणिक करिअरच्या संधी व त्यामुळे मिळणारे रोजगार यासंची आपण ओळख करुन घेऊया.
बारावी नंतर सर्वाधिक लोकप्रिय असा हा पर्याय आहे जे विद्यार्थी बारावी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेले असतात व ते यासाठी पात्र असतात.
मेडिकल म्हटले की आपल्या समोर एम.बी.बी.एस किंवा बी.डी.एस. हेच पर्याय दिसतात, परंतु याशिवाय बी.ए.एम.एस, बी.एच.एम.एस, पॅरामेडिकल कोर्सेस, डी.एम.एल.टी इत्यादी विविध पर्याय उपलब्ध आहेत. एम.बी.बी.एस., बी.डी.एस. या डिग्री कोर्ससाठी राष्ट्रीय व राज्य स्तरावर प्रवेश परिक्षाचे आयोजन केले जाते. व त्यामार्फत प्रवेश दिला जातो.
मेडिकल खालोखाल अभियांत्रिकी हा पुर्वी पासून एक लोकप्रिय करिअर पर्याय आहे. अभियांत्रिकी प्रवेशासाठी राज्य पातळीवर प्रवेश परिक्षा आयोजित केली जाते जे विद्यार्थी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या विषयासह बारावी उत्तीर्ण आहे ते या प्रवेश परिक्षासाठी पात्र असतात. प्रवेश परिक्षेतील प्राप्त गुणाणुक्रमांकावर प्रवेश निश्चित केला जातो. याशिवाय देश पातळीवरील आय.आय.टी., एन.आय.आय.टी., Regional Engineering College, Special Class Railway Apprentice, Army Engineering Services या सारख्या प्रथितयश संस्थेमध्ये त्याच्या प्रवेश परिक्षेमार्फत प्रवेश दिला जातो.
बारावीनंतर अनेक हुशार विद्यार्थी आज वाणिज्य विभागाकडे जाताना दिसतात. यामध्ये सी.ए., सी.एस., I.C.W.A. या सारखे विविध पर्याय उपलब्ध आहे. कुठल्याही शाखेचा विद्यार्थी यामध्ये प्रवेश घेऊ शकतो.
जे विद्यार्थी बारावी गणित व भौतिकशास्त्र विषयासह उत्तीर्ण असतात ते एन.डी.ए. मार्फत संरक्षण दलामध्ये मोठ्या राजपत्रित अधिकारी पदावर जाऊ शकतात.
जैव तंत्रज्ञानाच्या प्रगतीने शेती क्षेत्रामध्ये नवीन करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहे. विज्ञान शाखेचे विद्यार्थी या क्षेत्राकडे एक करिअरची उत्कृष्ट संधी म्हणून पाहू शकतात. प्रचंड प्रमाणात वाढणारी लोकसंख्या व या लोकसंख्येची भूख भागवणे या तत्त्वावर शेती संबंधित क्षेत्रामध्ये अनेक पर्यायी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. यामध्ये B.Sc. (Agree), B.sc (Horticulture), B. Tech, BVSc (Veterinary Science) असे विविध कोर्स उपलब्ध आहेत. हे कोर्स पूर्ण केल्यानंतर विविध शासकिय संस्था, बीज संशोधन संस्था, बीज निर्माण संस्था असे अनेकविध पर्याय उपलबध आहे. शिवाय आपण स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरु करु शकतो. किटकनाशके, बी-बियाणे विक्री केंद्रासाठी वरील कृषी संबंधित शिक्षण आवश्यक असते त्यानुसार परवाना मिळत असतो.
यामध्ये विज्ञान शाखेचा विद्यार्थी B. Pharmacy, D. Pharmacy या सारख्या अभ्यासक्रमाना प्रवेश घेऊ शकतो. वरील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सरकारी विभाग, खाजगी संशोधन संस्था तसेच Medical Representative म्हणून विविध रोजगाराचे पर्याय उपलब्ध असतात शिवाय विद्यार्थी स्वत:चा स्वतंत्र औषध विक्रेता परवाना मिळवून Medical Store उभे करु शकतो.
वरील कोर्ससाठी कुठल्याही शाखेचा विद्यार्थी हा प्रवेश पात्र असतो. D. Ed. (Diploma in Education) Diploma in Fire Arts अभ्यासक्रम यशस्वी रित्या पुर्ण केल्यानंतर सरकारी तसेच खाजगी शाळेमध्ये राजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहे. शासनाच्या RTE (Right to Education) मुळे या संधी मध्ये भरपूर वाढ होण्याची शक्यता आहे.
कुठल्याही शाखेचा बारावी उत्तीर्ण विद्यार्थी / विद्यार्थीनी 5 वर्षाच्या BSL, LLB या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतात.
ज्या विद्यार्थ्यांचा कल हा संशोधन क्षेत्रामध्ये असेल अशा विद्यार्थ्याने B.Sc., M.Sc. या कोर्सना प्रवेश घेऊन पुढे राष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्थेमध्ये प्रवेश घ्यावा.
जे विद्यार्थी 12 वी पास पात्रता धारण करतात त्यांना त्या पात्रतेच्या आधारे राज्य व देश पातळीवर विविध स्पर्धा परिक्षां मार्फत रोजगार मिळविता येऊ शकतो. SSC (Staff Selection Commission) लिपिक संवर्गासाठी देश पातळीवर स्पर्धा परिक्षा आयोजित करते. संरक्षण दलामध्ये लिपिक संवर्गासाठी विभाग स्तरावर परिक्षेचे आयोजन केले जातात. याशिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थी पोलिस शिपाई, Army, Navy, Air force, Paramilitary Forces (CRPF, CISF, SSB, BSF, ITBP) मधील शिपाई भरतीसाठी पात्र असतात. या संबंधित जाहिरात सर्व राज्य व देश स्तरावरील प्रमुख भाषिक वृत्त पत्रामध्ये येते.
12 वी पास व Typing / Short hand पात्रता उतीर्ण केल्यानंतर विद्यार्थी महाराष्ट्र शासन, रेल्वे, विविध महामंडळ, भारत सरकार, संरक्षण दल, विद्यापीठे इत्यादी विविध विभागामध्ये रोजगार मिळवू शकतात. त्याचबरोबर इच्छा असल्यास स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय देखील सुरु करु शकतात.
शिवणकाम, सौंदर्य शास्त्रासंबंधित कोर्स, पाककला संबंधित कोर्स, Interior Decoration गृहउद्योगा संबंधित पाठ्यक्रम या सारखे विविध पर्याय उपलब्ध आहेत.
ज्या विद्यार्थ्यांना विविध कारणास्तव पदवी पाठक्रमामध्ये प्रवेश घेता येत नाही अशा विद्यार्थ्यांना एक पर्याय म्हणून Polytechnic यामध्ये Technical केला जाऊ शकतो.
औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची नितांत आवश्यकता आहे व त्यासाठी पास उमेदवारांना प्राधान्य दिले जाते.
एकविसावे शतक पूर्णत: संगणकावर अवलंबून आहे. आपण दैनंदिन जीवनामध्ये संगणकाशिवाय राहूच शकत नाही. संगणक हे आजच्या जीवनशैलीचे व औद्योगिक क्षेत्राचे अविभाज्य अंग आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये रोजगाराचे विविध पर्याय उपलब्ध आहे. कोणत्याही (Arts, Commerce, Science) क्षेत्रातील विद्यार्थी यामध्ये प्रवेश घेऊ शकतो.
संगणक क्षेत्रातील महत्वाचे अभ्यासक्रम पुढील प्रमाणे आहे. BCA (Bachelor in Computer Application), BCM (Bachelor in Computer Management), Diploma in Computer Application, Diploma in Hardware Management याशिवाय संगणक क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे पदविका प्रमाणपत्र कोर्स देखील उपलब्ध आहे.
बारावी नंतर व्यवस्थापन क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्यांसाठी रोजगाराच्या पुरेस्या संधी उपलब्ध आहे. बारावी नंतर BBA (Bachelor in Business Administration), BBM (Bachelor in Business Management) हे महत्वाचे दोन पदवी अभ्यासक्रम देशातील विविध विद्यापीठामार्फत चालविले जातात.
जागतिक पातळीवर सर्वाधिक वेगाने वाढणारे क्षेत्र म्हणून पर्यटन क्षेत्राचा उल्लेख केला जातो. वाढणारे पर्यटन क्षेत्र हॉटेल व्यवसायासाठी पुरक असते. हॉटेल क्षेत्रामध्ये जर रोजगार हवा असेल, तर त्यासाठी हॉटेल व्यवस्थापन शास्त्रामधील पदवीधारकास प्राधान्य दिले जाते. बारावी पास विद्यार्थी हॉटेल व्यवस्थापनशास्त्र पदवी कोर्ससाठी पात्र असतो. हा कोर्स सरासरी चार वर्षाचा असतो व सदरील कोर्स यशस्वी रित्या पुर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यास पंचतारांकित हॉटेलमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार उपलब्ध होतो.
पर्यटन क्षेत्रामध्ये करिअर करु इच्छीणाऱ्यांसाठी बारावी नंतर मुबलक प्रमाणात संधी उपलब्ध असते BTM (Bachelor of Tourism Management), B.A. (Tourism) इत्यादी.
काही विद्यार्थ्यांना जन्मत:च अभिनयामध्ये गती असते. अशा विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षणासाठी आज देश पातळीवर अभिनय व नाट्य प्रशिक्षणाचे धडे देणारे विविध संस्था कार्यरत आहेत. या संस्था स्वत:च्या प्रवेश परिक्षा मार्फत विद्यार्थ्यास प्रवेश देतात.
वाढणारे टी.व्ही. नेटवर्क रोज काहीना काही चॅनेलची यामध्ये भर पडत असते. त्यामुळे या क्षेत्रामध्ये रोजगार संधीची काही कमी नाही. या क्षेत्रामधील काही महत्वाच्या संस्था म्हणजे FTII (Film and Television Institute of India), NSD (National School of Drama)
वाढणारे शहरे व भासणारी जागेची कमतरता यामुळे आपण सर्वजण घर बांधताना प्रथम विचार करतो तो Architecture चा आपल्या मनासारखे घर बांधताना त्यामध्ये सर्वाधिक महत्वाची भूमिका ही वास्तुविशाद याची असते. या क्षेत्रामध्ये रोजगारपुरक योग्य संधी ही उपलब्ध आहे बारावी नंतर B. Arch. (Bachelor in Architecture) या अभ्यासक्रमासाठी विज्ञान शाखेची विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. सदरील अभ्यासक्रम हा चार वर्षाचा असतो.
वरील शैक्षणिक अभ्यासक्रम व्यतिरिक्त आज इतर आणखी पर्याय उपलब्ध आहे व त्यामुळे रोजगार संधीही आहेत. एक वेगळा पर्याय म्हणून याकडे पाहता येईल. उदा. Event management, wedeling planner, Air Hostess, Cabin Crew, Receptionist, Jewellery design, पत्रकारिता Montessori Courses, Hospital Management, Nursing, X-ray Technician, Dietician इत्यादी क्षेत्रातून कुठलेही निवडू शकतात. निवडलेल्या क्षेत्रामध्ये निपुणता मिळवण्याची व त्यामध्ये विविधतेने नवीन प्रयोग निर्मितीची आपण जी नवीन संकल्पना विकसित करतो तीच तर आपली बुध्दीमत्ता असते.

प्रत्येकच स्त्रीच आयुष्यात आई होण्याच एक स्वप्न असत. बऱ्याच जणींना त्यात आयुष्याची पूर्तता, इतिकर्तव्यता वाटते. प्रत्येक स्त्रीच्या मनात तो आई होण्याचा क्षण कायम कोरलेला असतो. पण 'आई' होणं म्हणजे, गर्भधारणा करुन नऊ महिने गर्भाचे पोषण करुन सुलभ् प्रसूती झाल्यावर अंगावरचे दूध पाजून मुलाला वाढवणे. त्याला सुसंस्कृत करणे. निरोगी आत्मनिर्भर करणे. प्रजननाच्या सगळ्या क्रिया नैसर्गिक आणि काही त्रास न होता स्त्रीच्या आयुष्यात येवून जाव्यात अशी निसर्गाची योजना असते. जर या दरम्यान आहार नियोजन असेल तर हे सर्व सुरळीत पार पडू शकते.
त्याहीपूर्वी आहार नियोजन नवरा बायकोंनी मिळून करायला हवे. आणि गर्भधारणेचा विचार आणि प्रयत्न त्यानंतर करायला हवा. जर योग्य संतुलित आहार घेतला तरच दोघांच्याही शरीर, मन आणि बुद्धी यांच्या आरोग्याची पातळी उंचावेल या तीनही गोष्टी मिळून संपूर्ण व्यक्ती बनते. अशा संपूर्ण निरोगी व्यक्तिंमधून निर्माण झालेली संततीही तशीच संपूर्ण निरोगी असेल आणि अशी निरोगी व्यक्तीमत्वे असलेल्या कुटुंबाचा मिळून बनलेला समाजही मग तितकाच निरोगी असेल.
आज आपल्या देशात सर्वाधिक महिला कुपोषित आहेत. ॲनेमिक आहेत. हे कुपोषण गर्भाच्यादृष्टीने हानिकारक ठरू शकते. हे धोके शारीरिक असेल तर लगेच लक्षात येतात. कानाने ऐकू न येणे, पाठीचा कणा अधू असणे. मुकेपणा हृदयाला इजा किंवा भोक, मंदबुद्धी, दूध न पचणे, ॲलर्जी, हाडे ठिसूळ असणे, वारंवार आजारी पडणे. डायरिया, योग्य वजन नसणे वगैरे.
गर्भवती महिलेला उत्तम पौष्टिक आहाराची गरज असते हे आता सर्व मानतात. पण नक्की काय ते कळत नसतं. गर्भधारणेच्या आधीच अगदी लहानपणापासून योग्य संतुलित आहार मिळत राहिला तरच पुढे चालून प्रसूती सुसह्य आणि सुखकर होते. खरं म्हणजे बालिका व तरुणीच्या आहारावर पुढे होणारे अपत्य आणि त्याचे भविष्य अवलंबून असते.
जन्म झालेल्या शिशूचे जीवन स्त्रीबीज आणि पुरषबीजाच्या मीलनापासून सुरु होते. 37 ते 40 आठवड्यानंतर शिशूचा जन्म होतो. आई त्याला प्लॅसेंटाद्वारे पोषण करते. म्हणून तिने दुप्पटीने योग्य खायला हवे. गर्भावस्थेत शरीरात कितीतरी बदल घडत असतात. रक्ताचे प्रमाण 50 टक्के वाढते. पण त्यातील हिमोग्लोबीन, अल्ब्यूमीन, जीवनसत्वांचे प्रमाण मात्र घटते. आतड्यातील कार्य मंदावते. सुरुवातीची मळमळ व वाऱ्यांमुळे खाण्यापिण्यात फरक घडून येतात. पुढे बध्दकोष्ठता होते. मात्र जीवनसत्व ब 12, लोहच्या शोषणाची शक्ती, गर्भाशयांच्या स्नायूंचे प्रसरण, तसेच शरीराची चयापचयाची गती वाढते. वारंवार लघवीला जावे लागते त्यातून अमायनो ॲसिडस् आणि जीवनसत्वांचा नाश होतो. या सगळ्याकरता आहार अजूनच चांगला हवा.
काही पोषकतत्वांच्या कमतरतेमुळे काही औषधांमुळे अगदी दारुमुळेही, पानमसाले, तंबाखूमुळे, सिगारेट, बिडीमुळे गर्भावर दुष्परिणाम होवू शकतात. गर्भ रहाण्याआधीपासूनच या गोष्टी असतील तर त्या गर्भ जास्तच धोकादायक असतात. असही लक्षात आलय की भरपूर जीवनसत्वे, क्षारांच्या गोळ्या आणि योग्य संतुलित आहार गर्भधारणेआधी घेतल्यास शिशूतील जन्मजात दोष रोकता येवू शकतात. जसे की स्पायना ब्रायफिडा, ओढ फाटलेला, वगैरे. याचकरता योग्य पोषण आणि आरोग्याच्या चांगल्या सवयींची रुजवात किशोरावस्थेतच होणे आवश्यक आहे. गर्भाला कुपोषण औषधे रेडियेशन, अचानक इजा किंवा इतर वेदना यामुळे धोका पोहचू शकतो ज्याचे दुष्परिणाम जीवनभर सोसावे लागू शकतात. म्हणून पहिल्या 3 महिन्यात सर्वात जास्त काळजी घेणे महत्वाचे ठरते.
गर्भाच्या वाढीबरोबर पहिल्या 3 महिन्यात 1.2 किलो व नंतर 4 थ्या महिन्यापासून प्रत्येक आठवड्यात 350-450 ग्रॅम वजन वाढणे योग्य असते 9 महिन्या अखेर एकूण 10 -11 किलो वजन हे मातेचे वाढायला हवे. तसं असेल तरच गर्भाची वाढ योग्य म्हणावी. 9 महिन्यात यापैकी फक्त अर्धेच वजन वाढले तर त्याची 2 कारणे असू शकतात. 1. अयोग्य खाणे पिणे. 2. अती शारिरीक श्रम. या शिवाय काही कारण असेल तर डॉक्टरला दाखवून शंकांचे निरसन करायला हवे. 11-12 किलो पेक्षा जास्त वजन वाढले असेल तर ते शरीरावरील सूजेमुळे किंवा मेदवृद्धीमुळे असू शकते. जास्त वजन वाढूनही बाळ कमी वजनाचे निघू शकते व 7-8 किलो एवढेच वजन वाटल्यावर बाळ जास्त वजनाचेही असू शकते. स्थूल स्त्रियांना गर्भावस्थेत उच्च रक्तदाब, मधुमेह व इतर धोक्याची संभावना असते. कुपोषित स्त्रियांना म्हणजे ज्यांना पोटभर खायला मिळत नाही अशांना बरेचदा पूर्ण दिवस भरण्याआधीच मृत बालके होतात. नाहीतर प्रसूतीनंतर होणाऱ्या बालकात मृत्यूचे प्रमाण अधिक आढळते. गर्भावस्थेत खूप वजन वाढणे हे कमी वजन असण्यापेक्षा जास्त घातक आहे. ज्या मातेला साडे तीन किलो पेक्षा अधिक वजनाची बाळे होतात तिला पुढे चालून मधुमेहाचा धोका असतो. बाळाचे गर्भातील वय 37 आठवड्यांपेक्षा जास्त आणि जन्मजात वजन 2.5 किलो पेक्षा अधिक असणे महत्वाचे असते. 37 आठवड्यांत गर्भाच्या फुफ्फुसांची वाढ चांगली होते. बाळाची प्रकृती चांगली राहते. 37 आठवड्यांनंतर जन्मलेली परंतू 2 किलोपेक्षा कमी वजनाच्या मुलांची प्रकृती त्रासदायक असू शकते. पुढे जावून त्यांना हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर सारखे रोग उद्भवू शकतात. (अकाळी)
स्त्रीला गर्भाकरता अधिक पोषकतत्वांची गरज असते. तिचा गर्भाशय वाढत असतो. प्लॅसेंटा बनत असतो. एकूण तिचा रक्ताचा पुरवठा वाढत असतो. तिचे हृदय, मुत्रपिंड अधिक जोराने काम करतात. शरीरातील चरबीचे साठे वाढतात. याद्वारे नवजीवनाच्या जन्माची दुधाच्या साठ्याची तयारी होत असते. या सगळयांकरता जास्त पोषणतत्वांची गरज असते. मुलीला मासिक पाळी सुरु झाल्यांनतर दोनच वर्षात गर्भावस्था राहयला तर ते धोक्याचे असते. पोषणाची जास्त काळजी घ्यायला लागते.
गर्भावस्थेत विशिष्ट काही खावे व खाऊ नये असे काही नसते. पहिले 3 महिने मात्र पपई, फणस नक्कीच खाऊ नये. तसेच माती, खडू पेन्सिली पण खाऊ नये त्याने इन्फेक्शनचा धोका वाढतो. ज्यांच्यात लोह, झिंगची कमतरता असते त्या स्त्रिया हे खातात.
गर्भ जसजसा वाढत जातो तसतशी स्त्रीची अन्नघटकांची गरज वाढत जाते. दरवेळी ते संतुलित रुपातच घ्यायला हवे. डोहाळे लागून कांही वस्तू खाव्याशा वाटणे म्हणजे शरीरात काही अन्नघटकांची कमतरता आहे असे समजावे. डोहाळ जेवणांमध्ये भरपूर तेलकट तुपकर, तळलेले व गोड पदार्थ खाऊ नये. शीतपेय टाळावीत. ज्या पदार्थात स्वीटेक्स, शुगर फ्री, सारखे पदार्थ साखरेऐवजी टाकतात ते अत्यंत घातक होय. त्याचा गर्भावर वाईट परिणाम होवू शकतो.
मातेला रोज 250 ते 300 कॅलरिज ह्या संपूर्ण 280 दिवस मिळल्याच पाहिजेत. ज्या पोळी, भात, फळे, दूध, नाचणी यातून दिवसभरातून मिळाव्यात. रोज भरपूर प्रोटीन्स हवे जे दूध, डाळी, शेंगदाणे, कडधान्यात मिळतात.
कार्बोहायड्रेटस - रोज धान्य खाणे आवश्यक किमान 5-6 पोळ्या व दालभात यासाठी जीवनसत्वांची गरज वाढते. ती धान्ये फळे, ज्वारी, बाजरी, खजूर, अंजीरातून मिळतात.
फोलिक ॲसिड - शरीरातील रक्तसंचय वाढल्यामुळे या जीवनसत्वाची गरज वाढते. डि.एन.ए. च्या निर्मितीकरता ही गरज असते. या जीवनसत्वावर वाढ, रक्तकणांची निर्मिती अवलंबून असते. नाहीतर अर्भकाच्या न्यूरल ट्यूबमध्ये बिघाड, ॲनेमिया होवू शकतो. म्हणून स्त्रीने भरपूर पालेभाज्या, हरभरा, मशरुम्स, सलाद, अंडी, लिंबू, डाळ खावे. ज्या स्त्रिया मिर्गीकरता गोळ्या खातात त्यांनाही हे जीवनसत्व अधिक हवे.
जीवनसत्व अ - सर्व हिरव्या, नारंगी भाज्या, लालभोपळा, गाजर, रताळी, गाईचे दूध, प्रोटीन्सच्या चयापयासाठी आवश्यक आहे.
जीवनसत्व ब हे पण फार महत्वाचे. गर्भावस्थेतील मळमळ, उलट्या, डिप्रेशनकरता, न्यूरोट्रान्समिटर्सच्या उत्पन्नाकरता आवश्यक म्हणून सालासकट धान्ये, डाळी, भाज्या, फळे, गव्हांकूर, मशरुम, बटाटे, गाजर वगैरे आलटून पालटून खावे.
जीवनसत्व क - शरीरातील रोगप्रतिकारशक्ती साठी लोह कॅल्शियमच्या शोषणाकरता व अनेक इतर उलाढालींकरता हे आवश्यक आहे. हे जीवनसत्व फळे, लिंबू, भाज्या, आवळे, गुलाबपाकळ्यात, भाजीपाला, सलाद तसेच चिंचा, बोरे, पेरु यामध्ये सर्वाधिक प्रमाणात असते.
जीवनसत्व ड - शरीरातील कॅल्शियमचा समतोल ठीक ठेवते म्हणून पनीर, दूध, अंडी, मासे व भरपूर सूर्यप्रकाश घेणे आवश्यक असते.
जीवनसत्व ई - अर्भकाला कावीळ, हृदयात त्रास वगैरेपासून वाचवते. सर्व तेलबिया, हिरवा भाजीपाला व गव्हांकुरात आणि घाणीच्या तेलात भरपूर प्रमाणात असते.
कॅल्शियम - गर्भावस्थेत खूपच जरुरी आहे. गर्भाच्या वाढीकरता, सुलभ प्रसुतीकरता. हाडांची योग्य वाढ होण्यासाठी, भरपूर नाचणी, दूध, ताक हवे. भातात शिजताना खायचा चुना घालावा.
लोह - यावरच हिमोग्लोबीन बनते. भरपूर हिरव्या भाज्या, उसळी, डाळी, लिंबू आवश्यक आहे. स्वयंपाक लोखंडाच्या कढईत करावा.
झिंक - यावर गर्भाची वाढ निर्भर असते. दूध, पनीर, अंडी, मासे, संपूर्ण धान्ये, डाळी, गाजर, लसूण, अंकूरित धान्ये यामध्ये असते.
आयोडीन - गर्भाच्या वाढीसाठी महत्त्वाचे आहे. ते समुद्री मिठात, समुद्राकाठच्या जमिनीत असतं. ते व मॅग्नेशियम हे दूध, अंडी, भाज्या, पूर्ण डाळी, धान्यात असते.
रिफाईन्ड वस्तू खाऊ नये. अशा प्रकारे दिवसभरात सकाळी आठ ते नऊ दरम्यान नाष्टामध्ये आपले पारंपारिक नाष्टाचे पदार्थ आणि दूध असावे. दुपारचे जेवन हे 12 ते 2 या दरम्यान करावे. जेवनात वरणभात, भाजीपोळी, कोशिंबीर, दही, फळे हवीत. संध्याकाळी 5 ते 6 वाजता सुका नाष्टा करावा. यावेळी लाह्यांचा चिवडा खावा. तर रात्रीचे जेवन 8 ते 9 दरम्यान करावे. जेवनात वरणभात, भाजीपोळी, कोशिंबिरीचा समावेश असावा. दिवसभरात 4 चमचे घाणीचेच तेल व 1 चमचा तूप, भरपूर ताक, लिंबू, पाणी, सूप, खिचडी घ्यावी. फळे पण घ्यावीत. मांसाहार घेवू नये. ब्रेडबिस्किट, साखर, मिठाई, तळलेले पदार्थ नूडल्स, पिझ्झा, बर्गर, शीतपेये, उपास टाळावे. प्रिझव्हेटिव्हचे पदार्थ नको.
संपूर्ण 9 महिने कावीळ न होईल याची खूप खूप काळजी घ्यायलाच हवी. म्हणून पाणी पिताना बाहेरचं खाताना सतर्क असावं. ते टाळावं. चायनीज मधील ॲनिनोमोटोही अर्भकाकरता घातक असतं. म्हणूनच घरचं ताजं पहिल्या वाफेचं अन्न उत्तम असते. तांदूळ, हातसडीचाच वापरावा.
या सगळ्यांचं पालन करताना चांगली चरित्रे, गोष्टी, पुस्तकांचं वाचन करावं, चांगली प्रवचने ऐकावीत व चांगलेच कार्यक्रम बघावेत. नक्कीच गुणी, सदृढ, निरोगी संतती जन्मास येवून ती महान व्यक्ती बनेल.

हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण करणारे लोकरी पासून तयार होणारे कपडे घालणे गरजेचे असते. भारतात प्रत्येक ऋतुचा कालावधी साधारणतः चार महिन्यांचा असतो. त्यामुळे हिवाळ्यासाठी घेतलेल्या कपड्यांचा जवळपास आठ महिने सांभाळ करणे फार महत्वाचे असते.
कोणते लोकरीचे कपडे चांगले आणि उपयुक्त आहे याचाही विचार खरेदी करताना करणे गरजेचे आहे. मानवाने सर्वप्रथम लोकरीच्या कपड्यांना प्राधान्य दिले होते. लोकरीचा पांघरूण म्हणून उपयोग केला जात होता. कालांतराने त्यात सुधारणा आणि परिवर्तन होत गेले.
लोकर ही केसाळ प्राण्यापासून मिळते. त्यात मेंढ्या, विशिष्ट प्रकारच्या केसाळ बकर्या, ससे, (क्रिस मेंढी) याक, यांच्या शरीरावरील केसाळ भाग ज्यांना कापून त्याच्यावर प्रक्रीया करून लोकर तयार करण्यात येते. प्राण्याच्या शरीरावर असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या केसांवर तेथील लोकरीचा दर्जाही भिन्न असतो व त्यावरूनच लोकरीची ऊब ठरते. उंच पर्वतावर थंड हवेच्या ठिकाणी असणार्या प्राण्याच्या कातडीवरील केस कापून त्याला स्वच्छ करून, मशीनच्या द्वारे किंवा हातमागाद्वारे धागे तयार करून मशीन किंवा हातमागाद्वारे स्वेटर, जॅकेट, शॉल, कापड तयार केले जातात. आज परिधान करण्यात येणार्या सर्व महागड्या सूटमध्ये लोकरीचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळेच लोकरीचा व्यवसाय हा भारतातील मोठा उद्योग म्हणून ओळखला जातो. लोकरीचा दर्जा, मेंढ्याच्या जाती, केसांची लांबी, चमकदारपणा, मजबुतपणा या सर्वांचा विणण्यावर परिणाम होतो.
लोकरीचे पाच प्रकार आहेत.
पातळ किंवा महीन लोकरः
ही मेरिनो मेंढी पासून प्राप्त होते. या मेंढ्या प्रामुख्याने अमेरिकी, ऑस्ट्रेलिया पेनिस, दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकी आहेत. मेरिनो लोकर ही बारीक, मजबूत, कोमल व कताईसाठी उत्कृष्ट असल्यामुळे प्रसिद्ध आहे. महागड्या सूटवरच्या दर्जाचे हाताने विणलेले वस्त्र अत्यंत नाजूक पोशाख याच लोकरीपासून बनलेले असतात.
मध्यम लोकरः
ही लोकर ब्रिटनच्या मेंढ्यांपासून प्राप्त होते. महिन लोकर व लांब लोकरीच्या मधला प्रकार म्हणजे मध्यम लोकर आहे. कोट, ओव्हर कोट, स्त्रियांचे ड्रेस यांचे कपडे व ब्लॅंकेटसाठी याचा उपयोग करतात.
लांब लोकरः
विभिन्न जातीच्या मेंढ्यांमध्ये जास्त उंच असणाऱ्या, ज्यांचे मांस खाण्यात येते, अशा मेंढ्यांपासून लांब लोकर मिळते. यांची लांबी 10 ते 14 इंच व रुंदी 40 मायक्रोन असते. ही लोकर लिंकर्न, कौस्टवोल्ड, लीसेस्टर व रोमानी मार्श नावाने विख्यात आहे. लिंकन लोकर रुंद व बाहेरील भाग वलयांकित असतो. तसेच ही लोकर चमकणारी असते. कोटाचे कापड बनविण्यासाठी याचा उपयोग करतात.
वर्णसंकरित लोकरः
मध्यम महीन कोटिची लोकर मेरिनो वा रैमवूले जातीच्या आणि लांब लोकरीच्या मेंढीच्या वर्णसंकरित जातीपासून प्राप्त होते. मेरिनोची कोमलता तसेच लांब लोकरीची लांबी यात असते. या लोकरीचा रंगही चांगला असतो. या लोकरीचा उपयोग मोजे, बनियान तसेच स्त्री-पुरुषांच्या सर्व प्रकारच्या लोकरीच्या कपड्यांसाठी केला जातो.
गालिचा किंवा कालीनसाठी वापरण्यात येणारी लोकरः
ही लोकर आशियामधील मेंढ्यापासून मिळविली जाते. वाळवंटात अत्यल्प खायला मिळणाऱ्या भागात राहणाऱ्या मेंढ्यापासून ही लोकर मिळते व त्याच्या आजूबाजूच्या भागावर जमलेल्या चरबीयुक्त भागाच्या खाली लहान, जाडसर, रेशेदार लोकर तयार होते. याला केंप म्हणतात. या लोकरीचा उपयोग गालिचे, रग तयार करण्यासाठी करतात. यात अन्य प्रकारच्या लोकरीचे मिश्रण करून जाड, कमी दर्जाचे ओव्हरकोटचे कापड तयार करण्यात येते.
वर वर्णित पाचही प्रकारच्या माहितीतून आपणास निश्चितच हे कळले असेल, की स्वेटर किंवा लोकरीचे कपडे खरेदी करताना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात. बाजारात मोठ्या ब्रँडचे लोकरीचे विभिन्न वस्त्रांचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. म्हणूनच स्वेटर किंवा लोकरीच्या कपड्यांची खरेदी करताना सर्वप्रथम प्रत्येक कपड्यावर दिलेले कंपनीचे लेबल लक्षपूर्वक वाचावे. त्यात लोकरीचे प्रमाण व धाग्याचे प्रमाण किती आहे याची पाहणी करावी. बरेचदा स्वेटर डिझाईन मध्ये चांगले असते, परंतु वापरलेल्या लोकरीचा दर्जा हा निकृष्ट असतो. त्यामुळे पुरेशी गरमी त्यापासून मिळत नाही. उलटे घातल्यामुळे वेगळा वास व घाम येतो, म्हणूनच स्वेटर घेताना त्याचा दर्जा पाहणे गरजेचे आहे.
दुसरे अत्यंत महत्त्वाचे म्हणजे स्वेटर घेताना किंवा कोट घेताना ते घालून पहावे. जोपर्यंत आपल्या शरीरावर ते नीटनेटके बसत नाही तोपर्यंत बदलून घालून पहावे. याचा अर्थ शरीरावर योग्य बसणारे व दिसणारे स्वेटर परिधान करावे. खरेदी शांततापूर्ण पद्धतीने करावी, कारण नेहमीचे कपडे आपण वर्षभर सतत बदलून घालत असतो, परंतु लोकरीचे कपडे आपण वर्षभर घालत नाही. त्याचा वापर फक्त हिवाळ्यात करण्यात येतो. त्यामुळे दरवर्षी कपड्यांची नव्याने खरेदी करण्यात येतेच असे नाही. लोकरीचे कपडे हे शरीरावर आधीच घातलेल्या कपड्यांच्या वरून घालण्यात येतात. बरेचदा कोटाच्या बाह्या लहान व कोट मोठा असो, तो कोट शरीराला सुविधाजनक वाटत नाही. त्यामुळे जाड कोट घेताना शरीर, कपडे व कोट यामध्ये पुरेशी खेळती जागा असावी.
आपल्या शरीरावर कोणकोणते कपडे चांगले दिसतात याचा विचार घालताना करावा. बाजारात विभिन्न प्रकारचे, डिझाइनचे कपडे आपले लक्ष आकृष्ट करीत असतात. म्हणून या सर्वांतून आपल्याला शरीरावर योग्य दिसेल असे कपडे घ्यावेत. तसेच स्वेटर किंवा कोट घेतांना त्याला खिसे असणे आवश्यक आहे. थंडीच्या वेळी खिशात हात घालून चालणे, गप्पा मारणे यात काही और मजा असते. तसेच ओव्हरकोट घेताना वर त्याला लागून असलेली टोपीही असावी. जेणेकरून जास्त थंडीच्या वेळी टोपीमुळे कानाचे आणि डोक्याचे संरक्षण होईल.
संपूर्ण वर्षात थंडीचा कालावधी मर्यादितच असतो. त्यात ते लोकरीचे कपडे घालण्यात तर वेगळीच मजा असते. परंतु ते जास्त घालून मळतात. धुतल्यानंतर ते खराब होतील ही भिती मनात असते. म्हणून लोकरीच्या कपड्यांची स्वच्छता महत्त्वाची असते. सांभाळून ठेवलेले लोकरीचे कपडे काढल्यानंतर काही तास उन्हात वाळवावे. जेणेकरून त्यातील वास निघून जाईल. उन्हात वाळवल्यानंतर ते कपडे धुवावे.
सुरुवातीलाच ब्रशने धूळ झटकून नंतर ते कपडे धुवावेत. लोकरीच्या कपड्यांना फार वेळ साबणाच्या पाण्यात बुडवून न ठेवता ताबडतोब धुवावे. वाशिंग मशीनमध्ये लोकरीचे कपडे धुतांना त्यांना कापडी पिशवीत टाकून धुवावेत. जेणेकरून लोकरीवर फुसडे येणार नाही. तसेच गरम पाण्यात धुवू नये, ड्रायरनेही सुकवू नये. उन्हातही वाळवू नये, जेणेकरून रंग खराब होणार नाही. लोकरीच्या कपड्यांची खरेदी करताना गांभीर्याने विचार करूनच ग्राहकांनी खरेदी करावी. बाजारात वेगवेगळ्या कपड्यांची खरेदी डोळसपणे केल्याने ग्राहक दृष्टीचा विकास होईल.

टच द स्काय विथ ग्लोरी' असे थरारक घोषवाक्य असणान्या हवाई दलात प्रवेश करण्यासाठी उपलब्ध असलेल्या करिअर संधी आणि संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षांची माहिती-
भारताच्या संरक्षण दलामध्ये भूदल, हवाई दल, नौदल, तटरक्षक दल आणि इतर निमलष्करी सेना दले यांचा समावेश होतो. या संरक्षण दलांचा कारभार केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संरक्षण खात्याद्वारे स्वतंत्ररीत्या पाहिला जातो. देशाप्रती उत्कट प्रेम असणाऱ्या चतन्याने भारलेल्या आणि अहोरात्र सजग राहणाऱ्या आदर्श सनिकांच्या अतुलनीय कामगिरीमुळे भारतीय सेनादल जगात नावाजले जाते.
संरक्षण खात्यात काम करण्यासाठी आपण पात्र आहोत, असे आपल्याल वाटत असेल, तर यांपैकी कोणताही एक पर्याय स्वीकारून आपले आयुष्य (नव्याने जगण्यास सुरू करता येईल, याचे कारण संरक्षण खात्यातील नोकरी ही फक्त नोकरी नसून आयुष्य आगळ्या प्रकारे जगण्याचा मार्ग असतो. 'टच द स्काय विथ ग्लोरी' असे थरारक घोषवाक्य असणारे हवाई दल देशाप्रती निःस्वार्थपणे सेवारत आहे. या हवाई दलातील करिअर संधींची माहिती आज करून घेऊयात.
भारतीय हवाई दलाच्या तीन शाखा आहेत. फ्लाइंग, टेक्निकल आणि ग्राउंड ड्युटी. यातील नोकरी स्वीकारून तुम्ही इंडियन एअर फोर्समध्ये दाखल होऊ शकता. याकरिता पात्रता प्रवेश परीक्षा खालीलप्रमाणे आहेत
एन. डी. ए.
नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला केंद्रीय लोकसेवा आयोगाची लेखी परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते. ही परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. त्यानंतर साव्हस सिलेक्शन बोर्डाच्या मौखिक चाचणीला सामोरे जावे लागते. यातून निवडलेल्या उमेदवारांना पायलट अॅप्टिटयूड बॅटरी टेस्ट व वैद्यकीय चाचणी द्यावी लागते. या निवडपद्धतीद्वारे पर्मनंट कमिशन साठी निवड होते, या शिक्षणक्रमासाठी पात्रता खालीलप्रमाणे आहे:
वय शिक्षणक्रमाच्या सुरुवातीला १६ वर्षे सहा महिने ते १९ वर्षे
नागरिकत्व: भारतीय
लिग: पुरुष,
शैक्षणिक पात्रता १०+२ (गणित व भौतिकशास्त्र विषयासह) अंतिम वर्षांचे विद्यार्थीही अर्ज करू शकतात.
जाहिरात प्रसारित होण्याचा काळ से व डिसेंबर (यांत बदल होऊ शकतो.) कम्बाइण्ड डिफेन्स सव्हस एक्झामिनेशन (सी.डी.एस.ई.) पदवीधर किंवा इंजिनीअर्स या दलाच्या 'फ्लाइंग ब्रांचा मध्ये प्रवेश करू शकतात.
यासाठीची पात्रता
वय शिक्षणक्रम सुरू होते वेळी १९ ते २३ वप्रे
नागरिकत्व: भारतीय
लिंग: पुरुष
अविवाहित असणे आवश्यकः शैक्षणिक अर्हता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर (गणित व भौतिकशास्त्र विषयासह बारावी परीक्षा उत्तीर्ण)/ बी.ई./बी.टेक. (चार वर्षांचा अभ्यासक्रम)
शेवटच्या वर्षाचे किंवा सत्राचे विद्यार्थीही सदर परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. मात्र, दिलेल्या अवधीत विद्यापीठाकडून मिळालेले पदवी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी गुणांच्या टक्केवारीची अट नाही.
जून आणि ऑक्टोबर महिन्यात जाहिरात प्रसिद्ध होत असते. (यात बदल होऊ शकतो.)
शॉर्ट सर्व्हिस कमिशन
ही सेवा संधी जास्तीत जास्त १४ वर्षासाठी असून, एअर फोर्स कॉमन अँडमिशन टेस्ट या परीक्षेद्वारा तुम्ही शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या अर्हता चाचण्या देण्यासाठी पात्र होता. नंतर पायलट ऑप्टिटयूड बॅटरी टेस्ट व वैद्यकीय चाचणी द्यावी लागते. यासाठी महिला उमेदवारी अर्ज करू शकतात. यासाठीच्या आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे-
वय: १९ ते २३ वर्षे, डायरेक्टोरेट ऑफ सिव्हिल अॅव्हिएशनकडून प्राप्त झालेल्या कमर्शियल पायलट
लायसन्स धारकांसाठी वय वर्ष २५ असते.

गणिताच्या विकासाच्या अनेक बाबतीत प्राचीन भारतीय योगदान मूलभूत असल्याचे जगाने मान्य केले आहे. त्या संदर्भात इसवीसनानंतर सहावे ते बारावे शतक या काळात भारतामध्ये दिग्गज गणितींची एक मालिकाच पुढे आली हे विशेष, त्या गणितींची यादी बरीच मोठी आहे तरी आर्यभट, ब्रम्हगुप्त, महावीर आणि भास्कराचार्य (द्वितीय) ही त्यातील प्रमुख नावे आहेत. एकापेक्षा एक सरस असे सिद्धांत आणि संकल्पना तसेच पद्धती मांडून गणिताची अमूर्त आणि व्यावहारिक उपयोगिता वाढवण्यास त्या सर्वांनी मोलाचा हातभार लावला. मात्र त्यानंतर वारंवार झालेली परकीय आक्रमणे आणि अन्य ऐतिहासिक कारणांमुळे भारतातील राजकीय आणि सामाजिक स्थिती फार अस्थिर राहिली. दीर्घकालीन पारतंत्रामुळे एकूणच वातावरण गणित तसेच अन्य विषयांत लक्षणीय भर घालण्यास पोषक नव्हते हे खरे.
या पार्श्वभूमीवर श्रीनिवास रामानुजन (२२ डिसेंबर १९८७ ते २६ एप्रिल १९२०) या भारतीय गणितीचे काम अद्वितीय समजले जाते. आधुनिक काळात भारताला गणित विश्वात महत्वाचे स्थान परत मिळवून देण्यात त्यांनी केलेले कार्य अतिशय स्पृहणीय आहे. त्यांच्यापासून स्फूर्ती तसेच विश्वास घेऊन विसाव्या शतकात भारतात अनेक गणिती पुढे आले आणि जागतिक स्तरावर नावाजले गेले. उदाहणार्थ, आर. सी. बोस, पी. सी. महालनोबीस. एस. एस. श्रीखंडे, हरिश चंद्र, सी. आर. राव, पी. व्ही. सुखात्मे, श्रीराम अभ्यंकर, व्ही. पी. गोडांबे, डी. आर. कापरेकर, व्ही. एस. हुजुरबाजार, नरेंद्र करमरकर इत्यादी. मधल्या काळात खंडित झालेली भारतीय गणिती योगदानाची परंपरा रामानुजन यांच्यामुळे पुनर्जीवित झाली असे म्हणणे वावगे ठरू नये. एका अर्थाने हेदेखील त्यांचे गणित तसेच भारतासाठी योगदान मानले गेले पाहिजे.
रामानुजन हे निसर्गाचा एक अलौकिक चमत्कार मानले जातात. इतर विषयांवर लक्ष न देता केवळ आपल्याला आवडणाऱ्या गणित या विषयावर लक्ष केंद्रित केल्याने महाविदयालयिन शिक्षणदेखील पूर्ण न केलेल्या रामानुजन यांना सुचलेली गणिती सूत्रे अतिशय प्रगत गणिताचा भाग होती. आणि अशी सूत्रे एक किंवा दोन नसून, तब्बल ४,००० च्या जवळपास आहेत. विशेष म्हणजे त्यातील दोन तृतीयांश अगदी नवीन होती आणि काही तुरळक वगळता सगळी बरोबर ठरली आहेत. अगदी साध्या सूत्रापासून ते अतिशय जटील अशी ती आहेत. त्यातील बहुतेक अंकशास्त्र, कंटीन्यूड फॅक्शन्स, एलिप्टीक फंक्शन्स, अनंत मालिका आणि थिटा फंकशन या विषयांतील आहेत.
इंग्लंडमधील केम्ब्रिज स्थित ट्रिनीटी महाविद्यालयातील अंकशास्त्रातील त्याकाळी अर्ध्वयू असलेले प्राध्यापक जी. एच. हार्डी यांनी जेव्हा रामानुजनने त्यांना मद्रासहून पाठवलेल्या पत्रातील अशी नमुनादाखल सूत्रे व प्रमेये (जवळपास १००) पाहिली तेव्हा ते अचंबित झाले, कारण त्यांच्या मते अशी सूत्रे मांडू शकणारी व्यक्ती पराकोटीची गणितीच असू शकते. तरी त्यांनी चौकशी केली आणि बऱ्याच प्रयत्नांती मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये लेखाविभागात कारकुनी करत असलेल्या रामानुजनना १९१४ साली शिष्यवृत्ती देऊन केम्ब्रिजला आणले. त्यामुळे गणिताच्या इतिहासाचे एक नवे पर्वच सुरु झाले असे म्हणता येईल. मात्र त्याची कल्पना कोणालाही नव्हती. पण इंग्लंडमधील हवामान आणि जीवनशैली यांसोबत जुळवून घेणे सनातनी वातावरणात वाढलेल्या रामानुजन यांना एकूण कठीण गेले. बरेचवेळा त्यांना रुग्णालयात राहावे लागले. शेवटी प्रकृती फारच ढासळल्याने ते १९१९ मध्ये भारतात परतले आणि दुर्दैवाने त्यानंतर काही महिन्यानीच त्यांचे निधन झाले.
तथापि त्या थोड्या अवधीत त्यांचे स्वतंत्रपणे आणि हार्डी व अन्य संशोधकांसोबत अनेक गणिती लेख प्रसिद्ध झाले ज्यामुळे त्यांची प्रतिभा गणित-विश्वाला समजली. त्यांच्या अनोख्या गणिती कामाचा दर्जा सर्वदूर वाखाणला गेला. मात्र रामानुजन हे अतिशय नम आणि निगर्वी वृत्तीचे होते. हार्डीनी असे नमूद केले आहे की रामानुजन यांनी त्यांना मिळालेल्या यशाचा आणि गौरवाचा कधीही गवगवा केला नाही, त्याबाबतीत साधा उल्लेखही ते टाळत. असा माणूस विरळाच. एका इंग्रजाने एका भारतीय व्यक्तीबद्दल त्याकाळी असे आदराने बोलणे ही फार मोठी गोष्ट होती.
रामानुजन प्रामाणिकपणे सांगत की त्यांच्या स्वप्नात त्यांची नामक्कलची नामगिरि ही आराध्य देवता आणि नरसिंह देव प्रकट होऊन रक्ताचे थेंब सोडतात ज्यात असंख्य गणिती सूत्रे त्यांना दिसत आणि जागे झाल्यावर त्यातील आठवतील तितकी ते लिहून काढत मात्र ती सिध्द करण्यासाठी त्यांनी घेतलेले अपार कष्ट विसरता कामा नये. गणिती सूत्रे म्हणजे देवाच्या मनातील विचार असे ते मानत. कदाचित अशी कमालीची निष्पाप आणि तरल चितवृती यामुळेच त्यांना ती सूत्रे दिसत, निर्विकार व फक्त तर्कशुध्द गणिती पध्दतीत शिक्षण झालेल्या व्यक्तिना ती दिसणार नाहीत असे एक मत आहे. सारांश म्हणजे रामानुजन यांच्या असामान्य सर्जनशीलतेचे रहस्य समजणे दुरापास्त ठरले आहे.
रामानुजन हे एकदा रुग्णालयात असताना हार्डी त्यांना भेटावयास गेले असता त्यांच्या गणिती संवादपद्धतीप्रमाणे त्यांनी आपण आलेल्या टॅक्सीचा क्रमांक १७२९ होता, जो काही खास नव्हता असे उदगार काढले. त्यावर ताडकन उठून रामानुजननी सांगितले की ही पहिली नैसर्गिक संख्या आहे जी दोन नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज म्हणून दोन प्रकारे मांडता येते: १७२९ = १3 + १२3 = 93 + १०3. या संख्येचे वरील गुणधर्म नेमके त्याचवेळी रामानुजनना नेमके कसे सुचले आणि त्यापूर्वी कोणाला कसे लक्षात आले नव्हते हे विलक्षण वाटते. तरी १७२९ रामानुजन संख्या' किंवा 'टॅक्सी कॅब' या नावाने ओळखली जाते. अशा विविध प्रकारच्या संख्या शोधण्याचे संशोधन त्यापासून सुरु झाले, जे आजही मोठ्या जोमाने चालू आहे आणि अर्थातच त्यासाठी संगणकाची मदत आता घेतली जाते. काही विशिष्ट प्रगत गणिती गुणधर्म असल्यामुळे हीसुद्धा रामानुजन संख्या म्हणून संबोधली जाते. या संदर्भात रामानुजन यांचे सर्वोतम असे मानले जाणणारे सूत्र परिशिष्ट- १ मध्ये दिले आहे. खरोखरच प्रत्येक अंक आणि संख्या जणू काही रामानुजनचे परममित्र होते!
त्याचप्रमाणे प्रगत गणितात वापरला जाणारा ०.७६४२२३६५३... हा स्थिरांक लांदयू-रामानुजन या नावाने ओळखला जातो कारण त्या दोघांनी तो स्वतंत्रपणे शोधला होता. रामानुजननी 'पाय' (x) या सुपरिचित स्थिरांकाचे मूल्य काढण्याची मांडलेली कित्येक सूत्रे इतकी अदभूत आहेत की रामानुजन यांना उपजत अलौकिक गणिती देणगी होती हे सहज लक्षात येते.
जेमतेम ३२ वर्ष आयुष्य लाभलेल्या रामानुजन यांचे गणिती काम आजच नाही तर पुढील अनेक दशके किंवा शतकेसुध्दा संशोधकांना पुरुन उरेल इतके सखोल आणि विस्तृत आहे. अगदी मृत्यूशय्येवर असताना त्यांनी 'मॉक' थिटा फंकशन याबाबत मांडलेली संकल्पना आणि सूत्रे काळाच्या कितीतरी पुढे होती कारण ती अचूक आहेत याची सिद्धता गणितींना नुकतीच म्हणजे डिसेंबर २०१२ मध्ये देता आली. त्यांच्या या विशिष्ट कामाचा उपयोग गणित आणि भौतिकशास्त्राला पुढे नेण्यात महत्वाचा ठरला आहे.
रामानुजन यांना आणखी १५ ते २० वर्ष स्वास्थ्यपूर्ण आयुष्य लाभले असते तर त्यांच्या हातून आणखी किती अमूल्य गणिती माणिक मोती आपल्याला मिळाले असते याची कल्पना करणेही शक्य नाही. मात्र हा 'जर-तर' चा विषय झाला, आणि विविध अनुमान निघू शकतात.
१९९७ पासून 'द रामानुजन जर्नल' या नावाचे एक आंतरराष्ट्रीय नियतकालिक प्रकाशित केले जात आहे ज्यात त्यांच्या गणिती कार्याशी संबंधीत संशोधनपूर्ण दर्जेदार शोधलेख प्रसिद्ध होतात. तसेच २००५ पासून विकसनशील देशातील ४५ वर्षाहून कमी वय असलेल्या गणितीला उल्लेखनीय संशोधानासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर 'श्रीनिवास रामानुजन पारितोषिक' देण्यास सुरवात झाली आहे.
रामानुजन यांचे अल्प पण आगळेवेगळे आयुष्य तसेच त्यांच्या गणिती कार्याचे विविध पैलू सांगणारी अनेक पुस्तके, लेख, ललित व इतर प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे. यासंदर्भात नमुना म्हणून त्यांना एका सुप्रसिद्ध अमेरिकन गणितीने आपल्या पुस्तकात केलेली अर्पण पत्रिका परिशिष्ट - २ मध्ये दिली आहे. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ वेळोवेळी टपाल तिकिटे प्रसिद्ध झालेली आहेत. २२ डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस आपल्या देशात 'गणित दिवस' म्हणून साजरा केला जातो. तर २०१२ साल हे त्यांच्या १२५व्या जन्मवर्षानिमित्त भारतात राष्ट्रीय गणितवर्ष म्हणून साजरे केले गेले.
शारीरिक आणि आर्थिक स्थिती प्रतिकूल असतानादेखील त्यांचा गणिताला वाहून घेतलेला वसा आपल्या सर्वांना मार्गदर्शक आहे. तरी रामानुजन यांना मानवंदना देणे हे आपले कर्तव्य आहे कारण त्यांच्या योगदानामुळेच भारतचे नाव गणित क्षेत्रात परत प्रस्थापित झाले आहे हे विसरता कामा नये.

समान नागरी कायदा

भारतरत्न महिला

हॅप्पी ऑनलाईन शॉपिंग

भारतीय संविधान

मतदात्याचे हक्क आणि कर्तव्ये

जाणूया सीताफळ प्रक्रियेचे महत्व

12 वी नंतर काय?

गर्भावस्थेतील आहाराचे महत्व

स्वेटर आणि लोकरीचे कपडे खरेदी करतांना

गगनाला पंख नवे




