Related News
वर्षभरापुर्वी बांधण्यात आलेली विहीर मुसळधार पावसात ढासळली
वर्षभरापुर्वी बांधण्यात आलेली विहीर मुसळधार पावसात ढासळली

सुधागड तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन; शेतकऱ्यांना अनुदानावर ड्रम सिडर उपलब्ध
सुधागड तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन; शेतकऱ्यांना अनुदानावर ड्रम सिडर उपलब्ध

धुळ्यात पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

पालांदुर परिसरात एकच रात्री ४४ मी.मी पाऊसाची नोंद, पेरणीची लगबग
पालांदुर परिसरात एकच रात्री ४४ मी.मी पाऊसाची नोंद, पेरणीची लगबग

जिल्हा परिषदेचे कृषी सभापती यांच्या हस्ते इफको नॅनो युरिया खताच्या रथाचे उद्घाटन
जिल्हा परिषदेचे कृषी सभापती यांच्या हस्ते इफको नॅनो युरिया खताच्या रथाचे उद्घाटन

आता घरबसल्या जाणून घ्या कृषी केंद्रातील खताची उपलब्धता
आता घरबसल्या जाणून घ्या कृषी केंद्रातील खताची उपलब्धता


शेतमाल विक्रीची सद्यस्थिती आणि नवीन दिशा

द्वारे: डॉ. दादाभाऊ यादव, डॉ. जितेंद्र दोरगे, डॉ. दत्तात्रय सानप , तारीख: Sat, 23 Oct 2021 12:07 PM
Share on

शेतमाल विक्रीची सद्यस्थिती आणि नवीन दिशा

शेती पिकामध्ये तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, कापूस, ऊस, मसाल्याचे पदार्थ, फळे, भाजीपाला व फुले इत्यादींचा समावेश होतो. आपल्या देशातील व राज्यातील बहुतांशी पिकांच्या उत्पादकतेत वाढ झाली असल्याने उत्पादन वाढलेले आहे. आपल्या शेतकरी उत्पन्न घेण्यात निश्चितपणे आघाडीवर असला तरी त्याच्या मालाला योग्य अशी किंमत मिळविण्यात मात्र तो अपयशी ठरला असल्याचे दिसून येते. अलिकडच्या काळामध्ये पिकविलेला माल विकण्यापेक्षा ज्या मालाला बाजारात मागणी आहे तो माल पिकविणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणता माल किती प्रमाणात, कोणत्या स्वरुपात केव्हा व कोठे पाठवावा याचे नियोजन करणे खूपच महत्वाचे बनले आहे.

शेती पिकांचे उत्पादन व त्याची विक्री ही खूपच गुंतागुंतीची प्रक्रिया बनली आहे. पावसाच्या/निसर्गाच्या लहरीपणावर देशातील जवळपास 82 टक्के क्षेत्रावरील उत्पादन अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला शेतमाल हा विभिन्न प्रतीचा, हंगामी, नाशवंत व विशिष्ट भागात तयार झालेला असतो. प्रत्येक शेतकऱ्याचे उत्पादन हे एकूण उत्पादनाच्या अतिशय लहान भाग असतो. शेतीमाल उत्पादनातून कुटुंबातील माणसांच्या मुलभूत गरजा भागविणे, याला प्राधान्य दिले जाते. शेतीतील मोठी गुंतवणूक ही स्थिर स्वरुपाची आणि उत्पादनपूर्व काळापासून केली जात असल्याने शेती पिकांच्या उत्पादन खर्चाचे स्वरुप नेहमी बदलत असते. शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारीत किंमत मिळणे, त्याने घातलेल्या भांडवलाचा/गुंतवणुकींचा व केलेल्या श्रमाचा योग्य मोबदला मिळणे हे म्हणणे रास्त असले, तरी बहुतांश वेळा शेतकऱ्याला त्याच्या मालाची योग्य किंमत मिळत नसल्याचे दिसते. याची कारणे शोधण्यासाठी बाजारव्यवस्थेचा व विक्री व्यवस्थेतील समस्यांचा आढावा घेणे गरजेचे असते.

शेतीमध्ये उत्पादीत झालेला माल ग्राहकांपर्यंत पोहचविण्याची प्रक्रिया म्हणजे बाजार अथवा विक्री प्रक्रिया. यामध्ये उत्पादक (शेतकरी), मध्यस्थ, हुंडेकरी, कमिशन एजंट, व्यापारी व ग्राहक यांचा समावेश होतो, तर बाजारसेवा मध्ये मालाची एकत्रीकरण, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक, साठवणूक, प्रक्रिया, प्रिकुलींग विक्री यांचा समावेश होतो.

पिकांच्या/शेतमालांच्या किंमती निश्चित होण्यामध्ये वरील सर्व घटकांचा परिणाम असतो, कारण या सर्व विक्री प्रक्रियेमध्ये भाग घेणारे घटक आपल्या सेवेसाठीचा खर्च वसूल करत असतो, त्यामुळे ग्राहकाने शेत मालाला दिलेल्या किंमतीचा फारच थोडा वाटा उत्पादकास मिळताना दिसतो.

शेतीपिकांची काढणी योग्य वेळी झाल्यानंतर तो एकत्र केला जातो, परंतु तो माल बाजारपेठेत पाठविण्यापूर्वी स्वच्छ करणे, निवडणे व त्याची प्रतवारी करणे आवश्यक असते, कारण चांगल्या प्रतीच्या मालास बाजारात नेहमीच चांगला दर मिळाल्याचे दिसते, तसेच निवडलेला व प्रतवारी केलेल्या मालाची साठवण क्षमता ही वाढते. अन्नधान्याच्या बाबतीत आर्द्रतेचे योग्य प्रमाणही महत्वाचे ठरते. फळे व भाजीपाला यांची प्रतवारी आकार, वजन व रंग यावरुन तर फुलांची प्रतवारी जात व दांड्यांची लांबी यावरुन केली जाते. माल कोणत्या बाजारपेठेत पाठवायचा आहे याचाही विचार प्रतवारी करताना करणे महत्वाचे ठरते. उदा. हिरव्या रंगाचे टोमॅटो दूरच्या बाजारपेठेत, गुलाबी रंगाचे जवळच्या तर गडद लाल स्थानिक बाजारपेठेसाठी अशी प्रतवारी करावी लागते.

शेतपिकांचे/मालाचे पॅकिंग करतानाही माल बाजारपेठेपर्यंत पोहचेपर्यंत व्यवस्थित राहावा व वाहतुकीमध्ये त्याचे कमीत कमी नुकसान व्हावे हा एकच उद्देश असतो. मालाच्या स्वरुपानुसार गोण्या, लाकडी/प्लॉस्टीकचे क्रेट यांचा तर फळे व फुलांसाठी प्रत्येक नगासाठी पॅकींग अलिकडच्या काळात सुरु झाले असून त्यांना चांगली किंमतही मिळत आहेत. कडधान्य व तेलबियांचा 1 किलो, 5 किलोचे पॅकिंग, तांदूळ, ज्वारी, बाजरीचे 20-25 व 50 किलोचे पॅकींगला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येतो.

शेतमालाची किंमत ठरविण्यात वाहतुक हा महत्वाचा घटक आहे. शेतमाल विक्रीच्या अनेक अभ्यासावरुन असे दिसते की, एकूण विक्री खर्चामध्ये वाहतुक खर्चाचा वाटा 25 ते 30 टक्के इतका आहे. त्यामुळे वाहतुक स्वस्त व जलद असणे गरजेचे असून, वाहतुकीमध्ये शेतीमालाचे नुकसान कमी होणे आवश्यक आहे, त्यासाठी वाहतुकीच्या वाहनांमध्ये योग्य तापमान व आर्द्रता राखणे गरजेचे असते. निर्यातीसाठीच्या फळे, फुले व भाजीपाला यांच्या वाहतुकीसाठी वातानुकुलीत वाहनांची उपलब्धता महत्वाची ठरते.

साधारणपणे आढळणारे शेतमाल विक्रीचे पणन मार्ग / बाजार सारवळ्या

शेतकऱ्याच्या शेतावर उत्पादीत झालेला कृषि माल ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी विविध पणन मार्गाचा वापर केला जातो. त्यापैंकी प्रमुख पणन मार्ग-

 1. उत्पादक - ग्राहक
 2. पणनमार्ग उत्पादक व ग्राहक यांच्या दृष्टीने फायदेशीर पणन मार्ग असला तरी माल हाताळण्याच्या मर्यादेमुळे कमी वापर
 3. उत्पादक - किरकोळ विक्रेता - ग्राहक
 4. उत्पादक - प्राथमिक बाजारातील कमिशन एजंट - घाऊक विक्रेता - किरकोळ विक्रेता- ग्राहक
 5. उत्पादक - सहकारी विक्री संघ - घाऊक विक्रेता - किरकोळ विक्रेता - ग्राहक
 6. उत्पादक - काढणीपूर्व कंत्राटदार - घाऊक विक्रेता - किरकोळ विक्रेता - ग्राहक
 7. उत्पादक - निर्यातदार - परदेशातील ग्राहक
 8. उत्पादक - घाऊक विक्रेता - प्रक्रियांवर - ग्राहक

कृषि मालाच्या विक्रीच्या अभ्यासावरुन असे दिसून येते की ज्या पणन मार्गात कमीत कमी मध्यस्थ त्या मार्गात ग्राहकाच्या किंमतीमधील उत्पादकाचा वाटा जास्तीत जास्त राहिला आहे.

कृषि मालाला योग्य किंमत मिळणेसाठी मालाचा पुरवठा व मागणी यांच्यातील समतोल फार महत्वाचा ठरतो. बहुतांश कृषि माल हा हंगामी असल्याने, त्याची बाजारपेठेतील आवक ठराविक काळात होत असते. त्यामुळे जास्त आवक असणाऱ्या दिवसात शेतमालाचे भाव घसरतात, पर्यायाने शेतकऱ्यांचे नुकसान होते. अशा वेळी शास्त्रोक्त पध्दतीने शेतमाल साठविला व त्याच्या बाजारपेठेतील आवकीचे नियोजन केले तर शेतमालाच्या किंमतीमधील अस्थिरता दूर करता येते. तसेच विविध बाजारपेठांमधील बाजार माहिती उपलब्ध असेल (आवक व दरासंबंधीची माहिती) तर शेतकरी आपला माल योग्य त्या बाजारपेठेत पाठवून चांगली किंमत मिळवू शकतो.

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने व प्रतिकुल नैसर्गिक परिस्थितीशी सामना करत पिकविलेल्या शेतमालाला बहुतांशी वेळेस त्याने केलेल्या कष्टाचे दाम मिळण्यापेक्षा त्याने केलेला खर्च (निविष्ठांवरील) बाजारात वसूल होत नाही म्हणजेच प्रचलित बाजारव्यवस्था अकार्यक्षम असल्याचे स्पष्ट होते. ग्राहकाच्या किंमतमधील उत्पादकाचा वाटा हा औद्योगिक वस्तूमध्ये साधारणत: 70 ते 80 टक्क्याइतका असताना शेतमालाच्या बाबतीत मात्र तो 30 टक्क्यापासून 70 टक्के इतका कमी असल्याचे विविध अभ्यासाद्वारे सिध्द झालेले आहे. म्हणजेच शेतात प्रत्यक्ष न जाता, उत्पादन प्रक्रियेत सहभाग न घेता, केवळ शेतीमाल विक्रीद्वारे मध्यस्थ मोठे झाले आहेत, तर प्रत्यक्ष शेतात राबणारा उत्पादक व ग्राहक दोघेही भरडले जात आहे. सध्याच्या विक्री व्यवस्थेमध्ये उत्पादकास कमी वाटा मिळण्यामागे बाजारपेठेतील मध्यस्थांची अधिक संख्या, बाजारातील अनिष्ठ प्रथा (घटता, कडता नामा पध्दत इ.) बाजारसुविधांचा अभाव (प्रतवारी, पॅकिंग, शीतगृह, पूर्णशितकरण सुविधा) हे असल्याचे दिसून येते.

जागतिकीकरणामुळे शेती क्षेत्रातील सर्वच विभागात बदल घडून आले असताना बाजारव्यवस्था अधिक कार्यक्षम असणे गरजेचे बनले आहे. नियंत्रित बाजारपेठा कायदा शेतमालाची विक्री सुरळीत व्हावी यासाठी देशात स्वातंत्र्य पूर्वकाळापासून सुरु आहे. राज्यात 302 कृषि उत्पन्न बाजार तर 603 उपबाजार कार्यरत आहेत. राज्यातील व देशातील अनेक अभ्यासवरुन प्रचलीत बाजार व्यवस्थेमध्ये (नियंत्रित बाजारपेठा) अनेक त्रुटी असल्याचे दिसुन आल्याने त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी भारत सरकारने 2003 मध्ये तर महाराष्ट्र सरकारने 2005 मध्ये मार्केट मॉडेल ॲक्ट कायदा समंत केला आहे.

कृषिमाल विपणनाच्या बदलत्या संकल्पना अंगिकारणे फायद्याचे आहे. देशातील व राज्यातील पारंपारिक कृषिमालाच्या विक्री व्यवस्थेमध्येही अलिकडच्या काळात बदल होत आहेत. एकंदरीत रहाणीमानाचा आर्थिक स्तर उंचावल्यामुळे कृषिमाल विक्रीमध्येही रिटेल मॉल मार्फत विपणन व्यवस्था विकसीत होत आहे.

कृषि उत्पन्न समित्यांची स्थापना महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व नियमन) अधिनियम 1963 आणि नियम 1967 अन्वये झालेली आहे. शेतमालास किफायदेशीर बाजारभाव मिळवून देण्याच्या दृष्टीने बाजार आवारात सुविधा पुरविण्याचे काम बाजार समित्यांना करावे लागते. महाराष्ट्रातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांना प्रशासकीय अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने तसेच बाजार समित्यांचे व पर्यायाने शेतमालाचे नियमन करण्याचे महत्वपूर्ण कामकाज पणन संचालनालयामार्फत चालते. शेतमालाची विक्री व्यवहार व्यवस्थित व्हावा, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला वेळेत मिळावा हा उद्देश बाजार समितीच्या स्थापना करण्यामागे होता व आहे, परंतु हा उद्देश पुर्णपणे साध्य होत नसल्यामुळे कृषि उत्पन्न बाजार समिती कायद्यात बदल करण्याचे अनेक वेळा चर्चा होत असे.

उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील अंतर कमी करुन ग्राहक देत असलेल्या किंमतीतील जास्तीत जास्त हिस्सा हा उत्पादक शेतकऱ्यास मिळावा व मध्यस्थीकडे जाणारा अधिकचा वाटा कमी होवून उत्पादक व ग्राहक दोघाचे हित साधण्यासाठी राज्य सरकारने नियमनमुक्तीचा निर्णय घेतला. ही नियमनमुक्ती फक्त फळे व भाजीपाला या नाशवंत मालासाठीच आहे. ग्राहकाच्या किंमतमधील उत्पादकाचा वाटा 30 ते 70 टक्के आहे, ही तफावत नियमनमुक्तीने कमी होणार आहे. उत्पादक त्यांचा शेतमाल सरळ ग्राहकास विकु शकतो. यासाठी मात्र शेतकऱ्यास विक्रीसाठी वेळ द्यावा लागणार हे निश्चित, साहजिकच उत्पादक शेतकरी उत्पादनबरोबर- विक्रीव्यवस्थेत लक्ष घालतील, त्यातुन त्यांचा चांगला मोबदला मिळू शकेल.

उपलब्ध संधीचा फायदा घेण्यासाठी कृषिमाल विपननामध्ये नव-नवीन संकल्पनाचा वापर करणे आर्थिक फायद्याचे होणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने,

 1. विविध कृषि मालाचे काढणीपश्चात जादा मागणीच्या काळात, शहरातील ग्राहकांसाठी ग्राहक मेळावे / महोत्सव भरविणे व ग्राहकांना शेतमालाची थेट विक्री करणे.
 2. नियमित ग्राहकास आठवड्यातून एक प्रकारचा भाजीपाला अगर लिंबू, कोथिंबीर किंवा कढीपत्ता यापैकी काही माल एक दिवस मोफत देणे.
 3. जवळच्या मोठ्या शहरातील नव्याने विकसित नागरी वसाहतीत राहणाऱ्या ग्राहकांचे कृषिमाल मागणी व प्रकाराबाबतची सखोल सर्वेक्षण करणे. त्याप्रमाणे कृषिमाल उत्पादनाचे नियोजन सामुहिकरित्या करुन शेतातील ताजा कृषिमाल थेट ग्राहकांच्या दारी अशा प्रकारची पणन साखळी निर्माण करणे व कृषिमालाच्या गुणवत्तेत व पुरवठ्याबाबत कोणतीही तडजोड न स्विकारणे.
 4. भाजीपाला स्वच्छ करुन, कापून, मिक्स व स्वतंत्र अशा प्रकारच्या सर्व स्तरातील व आवश्यकतेनुसार खरेदी करण्यायोग्य आकारमानातील पॅकिंगमध्ये कृषिमालाचा पुरवठा थेट ग्राहकांना करणे
 5. शहरातील ठरावीक मोक्याच्या ठिकाणी सर्व प्रकारचा कृषिमाल विक्रीसाठी शासनाच्या मदतीने अथवा सामुदायीक पध्दतीने स्टॉलची निर्मिती करणे व खात्रीशीर पुरवठा व विक्री व्यवस्था निर्माण करणे.
 6. अलीकडे मुक्त अर्थव्यवस्थेमुळे खाजगीकरणातून शहरात तसेच सर्व प्रकारच्या रस्त्यावर पेट्रोलपंपाची उभारणी वाढलेली आहे. मोक्याच्या पेट्रोलपंपालगत ताजा भाजीपाला, फळे व चांगला कृषिमाल विक्रीसाठीचे स्टॉल उभारणी करणे, यामुळे कृषिमाल उत्पादकास विक्रीबरोबरच रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.
 7. शहरातील महिला बचत गटामार्फत कृषिमाल विक्रीसाठीची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यासाठी योग्य त्या सुविधांचा पुरवठा करणे व उत्पादक – महिला बचत गट – ग्राहक अशी थेट विक्री. कृषिमाल विक्रीसाठीची स्वतंत्र पर्यायी व्यवस्था विकसीत करणे, यामुळे शहरातील सर्व उपनगरामध्ये कृषीमाल विक्रीचे स्वतंत्र जाळे निर्माण करता येईल.
 8. समुहाने कराराची शेती व कृषिमालाची वायदे बाजारातील विक्री व्यवस्थेच्या अंगीकार करणे. कृषिमाल उत्पादकास निश्चितच फायद्याचे होणार आहे. यासाठी कृषिमाला उत्पादकांना योग्य माहितीची प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
 9. बाजार भावाच्या मंदीच्या काळात कृषिमाल उत्पादकांनीही शासनाच्या कृषिमाल तारण योजनेचा फायदा घेणे आवश्यक आहे.
 10. कृषिमाल बाजार माहिती केंद्राची उभारणी व माहितीच्या आधारे पीक लागवडीचे व विपणनाचे सुयोग्य नियोजन तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती होण्यास मदत होईल.

अशा विविध संकल्पनांचा वापर करुन विक्री केल्यास निश्चितपणे उत्पादक शेतकऱ्यास फायदा होईल, जेणेकरुन ग्राहकाच्या किंमतीतील जास्तीचा वाटा मध्यस्थानां जातो आहे तो कमी होवून उत्पादकास योग्य मोबदला मिळण्यास मदत होईल, यासाठी उत्पादक शेतकऱ्यांनी वेळेचे, मनुष्यबळाचे योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे.

Share on

Tags

Related News
news img

वर्षभरापुर्वी बांधण्यात आलेली विहीर मुसळधार पावसात ढासळली


news img

सुधागड तालुक्यात कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन; शेतकऱ्यांना अनुदानावर ड्रम सिडर उपलब्ध


news img

धुळ्यात पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट


news img

पालांदुर परिसरात एकच रात्री ४४ मी.मी पाऊसाची नोंद, पेरणीची लगबग


news img

जिल्हा परिषदेचे कृषी सभापती यांच्या हस्ते इफको नॅनो युरिया खताच्या रथाचे उद्घाटन


news img

आता घरबसल्या जाणून घ्या कृषी केंद्रातील खताची उपलब्धता


Most Viewed
news img

पिंपळवाडीत युवकाचा खून ! मित्रांनीच काढला काटा ?


news img

डिसले गुरूजींचे धक्कादायक सत्य आले समोर


news img

शिष्यवृत्तीसाठी आता अखेरचे ३ दिवस ३१ जानेवारीपर्यंत अखेरची मुदत


news img

एस.टी.विना बारावी परीक्षा देणाऱ्या विदयार्थ्यांचे हाल


news img

नगर शहरातील अजब रस्त्यांची गजब गोष्ट !