Related News
हिंगण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे व भाजीपाला ठोक मार्केटचे उद्घाटन
हिंगण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे व भाजीपाला ठोक मार्केटचे उद्घाटन

उन्हाळी धान खरेदीसाठी ऐकरी १६ क्विंटलची मर्यादा
उन्हाळी धान खरेदीसाठी ऐकरी १६ क्विंटलची मर्यादा

ऊसाच्या फडाला आग, ८ एकरावरील ऊस जळून खाक

दुष्काळ निर्मूलनासाठी सामुहिक प्रयत्न होणे गरजेचे
दुष्काळ निर्मूलनासाठी सामुहिक प्रयत्न होणे गरजेचे

चौल मधील "ताडगोळे"उन्हाळ्यात पर्यटकांची खास पसंती
चौल मधील "ताडगोळे"उन्हाळ्यात पर्यटकांची खास पसंती

राष्ट्रीय कृषी बाजार (ई नाम) योजना
राष्ट्रीय कृषी बाजार (ई नाम) योजना


शेती नियोजनाची गरज!

द्वारे: डॉ. दादाभाऊ यादव, डॉ. जितेंद्र दोरगे व डॉ. दत्तात्रय सानप , तारीख: Tue, 10 Aug 2021 04:41 PM
Share on

शेती नियोजनाची गरज!


भारतात पुरातन काळापासुन शेती हे उपजिविकेचे प्रमुख साधन समजले जात होते. त्यामुळे शेतीला व्यवसाय न मानता ती एक परंपरा म्हणून जोपासली जात असल्याने स्वत:चा उदरनिर्वाह करणे व इतरांसाठी अन्नधान्याची निर्मिती करणे हेच शेतीचे प्रमुख उद्दीष्ट होते. परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळात भारतीय शेती व्यवसायामध्ये अनेक बदल घडून आले. काळ जसा जसा लोटला जात आहे तशी तशी शेतीत नवनवीन बदल घडताना दिसतात. कृषि व सलग्न कार्य हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जात असून विशेषत: ग्रामीण अर्थव्यवस्थेवर या क्षेत्राचा प्रभाव अधिक आहे. कृषि क्षेत्र हे देशातील ५०.०० टक्के लोकसंख्येस प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या रोजगार देणारे देशातील सर्वात मोठे क्षेत्र मानले जाते. शिवाय शेतीस आवश्यक असणारे निविष्ठा यामध्ये खते, बी-बियाणे, औषधे तसेच विविध यंत्रे, अवजारे इत्यादीच्या कारखानदारीत वाढ होऊन रोजगार व अर्थव्यवस्था सुधारण्यास निश्चितपणे हातभार लागत आहे. 


शेती व्यवसायाची सद्यस्थिती-
आज भारतीय शेतकरी पारंपारीक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळला आहे. पारंपारीक शेतीमध्ये पारंपारीक पिकांचे (मुख्यत्वे अन्नधान्य पिके) उत्पादन पारंपारीक पध्दतीने घेतले जात होते, परंतु आधुनिक शेतीमध्ये संकरीत बियाणे, रासायनिक खते, औषधे, सिंचन व सुधारीत पीक उत्पादन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन घेतले जावू लागले आहे. आधुनिक शेतीमध्ये पीक विविधिकरण, शेतीतील विविधिकरण, फलोत्पादन पिके, हरीतगृहातील शेती, काटेकोर शेती, उच्च तंत्रज्ञान शेती, अपारंपारीक पिकांची शेती (जैव इंधन पिके, सुगंधी व औषधी वनस्पतींची लागवड), सेंद्रिय शेती यांचा समावेश होतो. याद्वारे शेती व्यवसायात आमुलाग्र बदल घडवून आणण्यात आला खरंतर स्वातंत्र्योत्तर काळात शेती सुधारणेसाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. सहाव्या दशकात घडून आलेली हरीतक्रांती हा याच प्रयत्नांचा दृश्य परिणाम म्हणता येईल. त्यामुळे आपण देशाच्या प्रचंड वेगाने वाढणा-या लोकसंख्येला पुरेसे अन्नधान्य पुरविण्यात यशस्वी होतो आहे. त्यामुळे कृषि क्षेत्राची विकासाची वाटचाल त्यातून शेती उत्पन्न वाढ यासाठी शेतीच्या नियोजनाची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. 


शेती नियोजनाची गरज-
जागतिकीकरण, हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती, वाढती लोकसंख्या वाढते औद्योगिकरण त्यातुनच वाढणारे शहरीकरण, बदलते राहणीमान व आहारपदधती यामुळे आधीच अवघड असलेला शेती व्यवसाय अधिकच गुंतागुतीचा बनत चालला आहे. त्यातच घटत असलेली जमीनधारणा, जास्तीचे कोरडवाहु क्षेत्र व पावसाचा लहरीपणा त्यामुळे जमीनीच्या प्रत्येक कणाला व पाण्याच्या प्रत्येक थेंबाला अधिक उत्पादक बनविणे गरजेचे बनले आहे. त्यामुळे शेती व्यवसाय हा पारंपारीक पध्दतीने न करता तो आधुनिक पध्दतीने करणे काळाची गरज बनली आहे. शेती व्यवसाय हा इतर व्यवसायाइतका सरळ म्हणजे ठरावीक गोष्टीचा विचार करून नियोजन केले की यशस्वी होण्याइतका सोपा नाही, कारण इतर व्यवसायापेक्षा यामध्ये शेतकऱ्यांना उत्पादन जोखीम व किंमत जोखीमेला सामोरे जावे लागते. त्यामुळे शेती व्यवसायापासून मिळणारा आर्थिक नफा हा अतिशय अस्थिर व बेभरवश्याचा असल्याचे बऱ्याच वेळा अनुभवण्यास मिळते. असे असले तरी पूर्वानुभव व शास्त्रोक्त पध्दतीचा अवलंब करून नियोजन केल्यास शेतीपासून अधिक व शाश्वत उत्पन्न मिळविता येवू शकते. व्यवसाय म्हटला की, त्याचे अर्थशास्त्र व फायदेशीरपणा या गोष्टी अंतर्भुत असतात व त्यासाठी नियोजनाची गरज असते.


शेती नियोजन-
नियोजनासाठी उपलब्ध असलेली साधनसामुग्री, गरजा व व्यवसायामागचा उद्देश यांची कल्पना असणे गरजेचे असते. वर्षाच्या सुरुवातीस हंगामनिहाय जमीन, सिंचनसुविधा, मनुष्यबळ, यंत्रसामुग्री, बाजारपेठ, तेथील मागणी व बाजारभाव इत्यादी गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीस शेती व्यवसायाचे नियोजन करताना हंगामनिहाय पीक आराखडा हा जमीन, भांडवल उपलब्ध मनुष्यबळ व निविष्ठा यांच्यासह विभागणी करून तयार करावा. व्यवसाय म्हटले म्हणजे हिशोब हे आलेच, त्यामुळे शेतीचा वर्षांचा अंदाजित खर्चाचा तपशिल तयार करणे नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. खर्चाची तपशीलवार नोंद घेतल्यास कोठे जास्त खर्च झाला? त्यानुसार कोणता खर्च कमी करता येईल? तसेच उत्पादन खर्च व मिळणारा दर यांचा ताळमेळ घालता येतो. हे पुढील वर्षाच्या नियोजनाच्या दृष्टीने व त्यातुन व्यवसाय फायदेशीर करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठरते. उत्पादन खर्चाबरोबर विविध बाजारपेठामध्ये मिळणारा बाजारभाव याविषयीची माहीती ठेवल्यास कोणत्या पिकांचे उत्पादन घ्यावे? व विक्री करताना कोणत्या बाजारपेठांत पाठवावे? याविषयी नियोजन करणे फायद्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरते. 


शेती नियोजनातील प्रमुख घटक-
शेती व्यवसायाच्या नियोजनातील जमीन, मजूर व भांडवल हे तीन प्रमुख घटक असून याबरोबरच त्यांची योग्य रितीने सांगड घालणे याला महत्व प्राप्त झाले आहे. पीक उत्पादन घेण्यासाठी जमीन हा अंत्यत महत्वाचा घटक असल्यामुळे व मर्यादीत जमीन व दुसरे पर्यायी साधन नसल्यामुळे जमिनीस जास्तीत जास्त उत्पादक बनविण्यासाठी जमिनीचे काळजीपूर्वक नियोजन होणे अत्यंत गरजेचे आहे. 


पीक आराखडा-
पीक आराखडा अथवा पिकांचे नियोजन हे पूर्णता उपलब्ध असणारी जमीन, अन्नधान्याची व चा-याची गरज, उपलब्ध भांडवल, मनुष्यबळ, सिचंन सुविधा, बाजारपेठेतील मागणी या घटकांवर अवलंबून असते. हे जरी खरे असले, तरी शेतक-यांनी पीक आराखडा तयार करताना त्यापासून जास्तीत जास्त आर्थिक फायदा कसा होईल व त्याचबरोबर शेतीची सुपीकता कशी टिकून राहील या गोष्टी नियोजनात अंर्तभुत करणे गरजेच आहे. प्रचलित अथवा सध्याच्या पिक आराखड्यातील कोणती पिके फायदेशीर आहेत? कोणत्या पिकासाठी कमी खर्च लागतो तसेच योग्य दर कोणत्या पिकास मिळू शकतो, अशी पिके कायम ठेवून कमी उत्पन्न देणारी, बाजारभावात अनिश्चितता असणारी पिके शक्यतो टाळावीत. त्याच्या बदल्यात कोणती पिके घेता येतील, त्याबाबतची अनुकुल परिस्थिती विचारात घेवून नवीन वर्षाचा पीक आराखडा ठरवावा. शक्यतो विविध पिकांना त्यांच्या फायद्याच्या क्रमानुसार क्षेत्राची विभागणी करावी. एखादे पीक फार फायदेशीर वाटते म्हणून सर्व क्षेत्र त्या पिकास देणे घातक ठरू शकते, परंतु विविध पिकांचा पीक आराखड्यात समावेश केल्यास एखादे पिकाचे दर कोसळल्यास होणारा तोटा दुसऱ्या पिकाच्या उत्पादनातुन भरून निघु शकतो.


जमीन नियोजन-
जमिनी - जमिनीमध्ये फरक असल्यामुळे पीक आराखड्यात पिकांच्या आवश्यकतेनुसार जमिनीची विभागणी करावी, कारण प्रत्येक पिकासाठी वेगवेगळी जमिनीच्या प्रकाराची आवश्यकता असते. काही पिके हलक्या जमीनीतही चांगली उत्पादने देऊ शकतात. तर काही पिकांना भारी जमीनच लागते. उपलब्ध असलेली जास्तीत जास्त जमीन वहीतीखाली ठेवणे जरी फायदेशीर असले तरी जमिनीचा मगदूर व प्रत टिकून ठेवण्यासाठी जमीन हंगामी पडीक ठेवणे, पिकांची फेरपालट करणे आवश्यक त्या जमीन सुधारणा करणे, जमिनीची धूप कशी कमी होईल व पावसाच्या पाण्याचा सुयोग्य वापर कसा करता येईल (शेततळे, मृद व जलसंधारण उपचार इ.) याचे नियोजन करणे शक्य असेल तर हिरवळीचे पिके घेणे, बांधावर अथवा पडीक जमिनीत ग्लिरीसीडीया लावणे ज्यायोगे हिरवळीचे खत उपलब्ध होवून जमिनीचा कार्यक्षमतेने वापर होईल.


मनुष्यबळाचे नियोजन-
    पीक उत्पादनासाठी जमिनीबरोबरच महत्वाचा घटक म्हणजे उपलब्ध मजूर/ मानवी श्रम होय. वाढती लोकसंख्या व वारसा हक्कामुळे दिवसेंदिवस जमिनीचे आकारमान कमी होत आहे. त्यामुळे घरात असलेल्या मनुष्य बळासाठी पुरेसा रोजगार किंवा काम पारंपारीक पीक पध्दतीतून मिळेलच याची शाश्वती नसते. त्यासाठी पिक आराखडयात उपलब्ध साधनसामुग्रीच्या अनुषंगाने बदल केले तर वर्षभर पुरेल एवढया रोजगाराच्या संधी निर्माण होतील. श्रम शक्ती ही साठवून ठेवण्यासारखी गोष्ट नसल्याने कुटुंबातील सर्व पुरूष व स्त्रियांना उत्पादक काम उपलब्ध करण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. इतर व्यवसायाप्रमाणे शेती व्यवसायाय सुद्धा कुंटूबातील काही मनुष्यबळ उत्पादनासाठी व तरूण आणि शिक्षित मनुष्यबळ शेतीमाल विक्री व्यवस्थेत वापरल्यास केवळ रोजगारच उपलब्ध होणार नाही, तर विक्री व्यवस्थेतील मध्यस्थांमार्फत होणारी फसवणूक व अतिरीक्त सेवाखर्च कमी होऊन शेतक-याच्या उपन्नात भर पडणार आहे.

 
भांडवल नियोजन-
अर्थशास्त्रीय व्याख्येनुसार जी संपत्ती आणखी संपत्ती निर्माण करण्यासाठी वापरली जाते, तीला ‘भांडवल’ म्हणतात किंवा जी वस्तु दुस-या वस्तुच्या निर्मितीसाठी किंवा सेवा निर्मितीसाठी वापरली जाते तीला ‘भांडवल’ म्हणतात. शेती व्यवसायात कृषि उत्पादनासाठी आवश्यक असणा-या बाबींमध्ये बी-बियाणे, खते इ. निविष्ठाचा खेळते भांडवल तर ट्रॅक्टर, इलेक्ट्रीक मोटार इत्यादींचा समावेश स्थिर भांडवलामध्ये होतो. बदलत्या कृषि उत्पादन तंत्रज्ञानामध्ये सुधारीत बियाणे, खते, औषधे यांसारख्या खर्चीक निविष्ठांचा वापर वाढल्याने त्यासाठी पुरेशा भांडवलाची आवश्यकता असते. ते भांडवल विविध पिकांचे उत्पादन करून त्यांची विक्री केल्यानंतरच उत्पादकाच्या हातात पडते. उत्पादन प्रक्रियेत लागणारे भांडवल उत्पादकाला एकतर त्यांच्या गतवर्षीच्या उत्पादनातील बचतीतून अथवा कर्ज काढून उभे करावे लागते. योग्य वेळी भांडवलाची उपलब्धता, शेती उत्पादनासाठी आवश्यक गोष्ट आहे. शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन करत असताना पुढील वर्षभरातील घ्यावयाची पिके, शेतीपुरक व्यवसाय, गतवर्षातील कर्जाची परत फेड व इतर कौटुंबीक गरजा लक्षात घेऊन किती भांडवलाची गरज भासणार आहे? त्यापैकी स्वतःकडील भांडवलाची उपलब्धता किती आहे? कोणत्या संस्थेकडून किती प्रमाणात भांडवलाचा पुरवठा होऊ शकतो याचे नियोजन करणे गरजेचे आहे. घेतलेल्या कर्जाला विमा अच्छादन देणे गरजेचे आहे. त्यामुळे अनैर्सगिक आपत्तीपासून होणा-या नुकसानीची तीव्रता कमी करणे शक्य होते.


शेतमाल काढणीपश्चात प्रक्रिया व विक्री नियोजन-
पीक उत्पादनानंतर काढणी पश्चात व्यवस्थापन अतिशय महत्वाचे आहे. कारण मोठया कष्टाने व मेहनतीने पिकविलेला शेतमाल योग्य रितीने प्राथमिक प्रक्रिया (निवडण, वाळविणे इ.) अभावी व योग्य साठवणूकीच्या अभावी वाया जातो. योग्य प्रतवारी अथवा पॅकिंग अभावी बाजारात कमी किमतीने विकला जातो. योग्य बाजारपेठेत न पाठविल्याने कमी भाव मिळून आर्थिक नुकसान होते. यासाठी पिकांची काढणी केव्हा होणार आहे. त्यानुसार साठवणूक, वाहतूक व विक्री व्यवस्थेचे नियोजन करावे. अतिनाशवंत मालासाठी योग्य बाजारपेठेची निवड करून त्याची त्वरीत विक्री करावी, वेगवेगळ्या बाजारपेठेतील विविध शेतीमालास मिळणारा दर या विषयीची अद्ययावत माहिती एकाच जागेवरून इंटनेटव्दारे घेवून शेतमाल विक्रीचे नियोजन करणे सहज शक्य आहे. शेतमालाची आवक व किमंतीचा अभ्यास करून आपल्या शेतावरील पिकांचे नियोजन करावे. योग्य बाजारभाव मिळविण्यासाठी सामुहीक विक्री, सहकारी संस्थांमार्फत विक्री यासारखे कोणते पर्याय योग्य आहेत हे ठरवावे. खरेतर शेती विक्रीव्यवस्थेतील मध्यस्थामुळे ग्राहकांच्या किंमतीतील मोठा हिस्सा हा मध्यस्थानां जातो, त्यामुळे स्वत:च शेतीमालाची विक्री केल्यास चांगला मोबदला मिळु शकतो. दुध उत्पादक घरपोहच दुध दररोज देवू शकतो तर इतर शेती उत्पादन उदारणार्थ भाजीपाला, फळे, फुले हे उत्पादनसुद्धा एक- दोन दिवासातुन घरपोहच देता येवू शकते. तसेच धान्यसुद्धा दरवर्षीची गरज लक्षात घेता शहरातील एका विशिष्ट भागासाठीचे धान्य ग्राहक ठरवून त्यांना दरवर्षी धान्य योग्य किंमतीत पोहच देता येईल. जेणेकरून मध्यस्थानां जाणारा मोठा हिस्सा उत्पादकानां मिळेल तसेच ग्राहकांना सुद्धा वाजवी दरात शेती माल मिळेल. सध्याचे बाजाराचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन योग्य पॅकींग मध्ये शिवाय प्रतवारी करून शेतीमालाची विक्री करण्याचे नियोजन असावे, जेणे करून मालास चांगली किंमत मिळेल.


शेती हा परंपरांगत व्यवसाय असल्याने शेतकरी हा शेतीचे नियोजन पूर्वीपासूनच ढोबळपणाने करत होता. परंतु सध्याच्या बदलत्या परिस्थितीमुळे नियोजनात अधिक अधिक जागृतता आली आहे. त्या दृष्टीकोनातुन शेतीत व्यावसायिकता आणली पाहिजे व शेती व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी व्यवसायाची सर्व तत्वे म्हणजे नियोजन आराखडा तयार करणे व आराखड्याची कार्यक्षमपणे अंमलबजावणी करणे, योजनेचे आर्थिक मुल्यमापन करणे ही काळाची गरज बनलेली आहे. कमी खर्चात शेतमाल पिकविणे, काढणी पश्चात नुकसान टाळणे व योग्य रितीने विक्री करून जास्तीत जास्त आर्थिक नफा मिळविणे हा शेती नियोजनाचा मुख्य उद्देश आहे.

Share on

Tags

Related News
news img

हिंगण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे व भाजीपाला ठोक मार्केटचे उद्घाटन


news img

उन्हाळी धान खरेदीसाठी ऐकरी १६ क्विंटलची मर्यादा


news img

ऊसाच्या फडाला आग, ८ एकरावरील ऊस जळून खाक


दुष्काळ निर्मूलनासाठी सामुहिक प्रयत्न होणे गरजेचे


news img

चौल मधील "ताडगोळे"उन्हाळ्यात पर्यटकांची खास पसंती


news img

राष्ट्रीय कृषी बाजार (ई नाम) योजना


Most Viewed
news img

पिंपळवाडीत युवकाचा खून ! मित्रांनीच काढला काटा ?


news img

डिसले गुरूजींचे धक्कादायक सत्य आले समोर


news img

शिष्यवृत्तीसाठी आता अखेरचे ३ दिवस ३१ जानेवारीपर्यंत अखेरची मुदत


news img

एस.टी.विना बारावी परीक्षा देणाऱ्या विदयार्थ्यांचे हाल


news img

नगर शहरातील अजब रस्त्यांची गजब गोष्ट !